मुंबईत वायुप्रदूषणाला हातभार लावणाऱ्या 43 बेकऱ्यांवर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. स्वच्छ इंधनाचा वापर न करणाऱ्या या बेकऱ्यांचे परवाने रद्द करून त्यांना बंद करण्यात आले आहे.

महापालिकेच्या कारवाईचा फोकस लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्यांवर आहे. या इंधनामुळे धूर आणि सूक्ष्म कणांचे उत्सर्जन वाढते, त्यामुळे शहराच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

यापूर्वी बेकरी व्यवसायांना PNG किंवा इतर स्वच्छ इंधनाकडे वळण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. उपलब्ध माहितीनुसार, मुंबईतील अनेक बेकऱ्यांनी स्वच्छ इंधनाचा वापर सुरू केला आहे, काही बेकऱ्यांमध्ये रूपांतरणाचे काम सुरू आहे; मात्र नियमांचे पालन न करणाऱ्या युनिट्सवर कारवाई कायम ठेवण्यात आली आहे.

महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मोहिमेत बांधकामांमधून होणारी धूळ, रस्त्यावरील धूळ आणि उघड्यावर कचरा जाळण्याबरोबरच पारंपरिक इंधन वापरणाऱ्या बेकऱ्यांनाही महत्त्वाचा प्रदूषण स्रोत मानले जात आहे.