दिवाळी, दुर्गापूजा आणि छठ उत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2026 दरम्यान 16 मार्गांवर एकूण 418 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

या नियोजनात नागपूर-हडपसर-नागपूर मार्गावरील 26 द्वि-साप्ताहिक फेऱ्या आणि 14 साप्ताहिक फेऱ्यांचा समावेश आहे. पुणे-न्यू अमरावती-पुणे मार्गावर 12 साप्ताहिक वातानुकूलित विशेष फेऱ्या धावतील. याशिवाय हडपसर-गाझियाबाद सिटी-हडपसर मार्गावर 24 द्वि-साप्ताहिक सेवा ठेवण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या इतर विशेष सेवांमध्ये मुंबई, पुणे, हडपसर, नागपूर आणि कोल्हापूरहून उत्तर भारत, दक्षिण भारत तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांना जोडणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव मार्गावर 14 साप्ताहिक फेऱ्या, तर लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नॉर्थ मार्गावर 12 साप्ताहिक फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

काही गाड्यांचे आरक्षण 27 सप्टेंबरपासून, तर उर्वरित सेवांचे आरक्षण 28 सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. प्रवासी संगणकीकृत आरक्षण केंद्रे किंवा IRCTCच्या माध्यमातून तिकीट बुक करू शकतात. अनारक्षित डब्यांसाठी UTS प्रणाली आणि RailOne अॅपचा वापर करता येईल.